मुंबईतील अनेक परिसर कंटेनमेंट झोन, या झोनमध्ये कसं चालणार काम?

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात सर्वात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे पाऊल उचलले आहे. मुंबईमध्ये ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळलेला आहे, अशा ठिकाणापासूनआणि परिस्थितीनुरूप ठराविक परिघातील क्षेत्र हे बाधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येत आहे. हे क्षेत्र 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. 'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात परिस्थितीनुरुप गरजेचे वाटल्यास उर्वरित क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करून त्यावर देखरेख ठेवली जात आहे.

ज्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे, अशी इमारत आणि त्या लगतची इमारत ही परिस्थितीनुरूप 'बाधित क्षेत्र' अर्थात 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अनेक इमारती असणाऱ्या‌ एखाद्या मोठ्या सोसायटीमधील एका इमारतीत बाधित रुग्ण आढळून आला असल्यास, सदर संपूर्ण सोसायटी 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्याची गरज नाही. तर त्या सोसायटीतील ज्या इमारती मध्ये बाधित रुग्ण आढळून आला असेल, ती इमारत 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्याची पद्धती अवलंबण्यात येत आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन त्या इमारती लगतच्या काही इमारती ह्या 'कंटेनमेंट झोन' मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

एक इमारत किंवा काही इमारती यांचा समावेश 'कंटेनमेंट झोन' मध्ये केल्यानंतर सदर परिसर बंदिस्त करण्यात येत असून सदर परिसरात प्रवेश बंदी लागू करण्यात येत आहे. तसेच अशा परिसरातील नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा सुविधा या इमारतीच्या किंवा परिसराच्या प्रवेशद्वारावर सशुल्क पद्धतीने देण्यात येत आहेत. अशा परिसराच्या लगतच्या इमारती या 'बफर झोन' म्हणून निर्धारित करण्याचा व देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय परिस्थितीनुरूप घेतला जात आहे. 'बफर झोन' परिसरात केवळ अत्यावश्यक सेवांसाठी हीच मर्यादित प्रवेश देता येऊ शकेल.